जल जीवन मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रात ७१ टक्के घरांमध्ये नळाद्वारे पाणी

राज्यात मार्च २०१९पर्यंत ग्रामीण भागातील एकूण घरांपकी केवळ ३८ टक्के घरांमध्ये नळाद्वारे पाणी पोहोचत होते.

            फोटो स्त्रोत : JJM Dashboard


अमरावती, राम वाडीभष्मे : पाण्यासाठी गावागावात महिलांची आणि लहान मुलांची होणारी वणवण थांबविण्यासाठी तीन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी ‘जल जीवन मोहिमे’ अंतर्गत महाराष्ट्राने प्रगती करत ७०.९० टक्के घरांमध्ये नळाद्वारे पाणी पोहोचविण्यात यश मिळवले आहे.

केंद्र आणि राज्य यांच्या प्रत्येकी ५० टक्के भागीदारीतून राबविल्या जाणाऱ्या मोहिमेचा लाभ सर्वाधिक बिहारने घेतला. या योजनेअंतर्गत १ कोटी ५७ लाख ४० हजार ३३० घरांमध्ये (एकूण घरांच्या ९१.४० टक्के) बिहारने पाणी पोहोचविले. 

ही योजना सुरू झाली तेव्हा म्हणजे मार्च, २०१९ मध्ये राज्यातील साधारणपणे ५० लाख घरांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा होत होता. आता महाराष्ट्रातील १ कोटी ४२ लाख घरांपकी १ कोटी ३ लाख ५७ हजार ६५१ घरांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. साधारणतः तीन वर्षांत महाराष्ट्राने हे साध्य केले आहे.

देशातील एकूण घरांची संख्या १९ कोटी ३१ लाख ९९ हजार ८२३ असून ऑगस्ट २०१९ मध्ये केवळ १६.७५% टक्के  म्हणजे ३ कोटी २३ लाख ७२ हजार ८३८ घरांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठय़ाची सोय होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ‘हर घर जल’ची घोषणा करत जल जीवन मोहिमेला वेग दिला. ७एप्रिल २०२२ पर्यंत देशातील  कोटी ९कोटी ३९ लाख ३६ हजार ८३८ म्हणजे ४८.६२ टक्के घरांपर्यंत पाणी पोहोचले.

राज्याची स्थिति 

राज्यातील ११,८४८ गावांमध्ये घरगुती नळ कनेक्शन मिळालेले आहेत. ४,४२६ गावांमध्ये नळ सुविधा देण्याचे काम मार्गावर आहे. तसेच २४,२२१ गावांमध्ये नळ सुविधा उपलब्ध करण्याचे काम सुरू व्हायचे आहे. राज्यातील जळगाव जिल्ह्यात ६,८१,२१६ घरे असून तिथे सर्वाधिक म्हणजेच १००% घरांकरिता नळ व्यवस्था लागू करण्यात आलेली आहे.

जालना, धुळे, नागपूर, वर्धा, लातूर, सोलापूर, बुलढाणा, कोल्हापूर, सातारा, नाशिक, रायगड आणि अमरावती इत्यादी जिल्ह्यांमध्ये ७५-१००% नळ सुविधा उपलब्ध झालेली आहे. उस्मानाबाद, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, अकोला, हिंगोली, वाशीम, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, नांदेड, यवतमाळ, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, परभणी, ठाणे, चंद्रपूर इत्यादी जिल्ह्यांमध्ये ५१-७५% नळ व्यवस्था उपलब्ध झालेली आहे. 

बीड, नंदुरबार आणि पालघर या तीन जिल्ह्यांमध्ये २६-५०% नळ व्यवस्था झालेली आहे. २०१९ मध्ये ही योजना लागू झाल्यापासून अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक ४,३७,८८२ म्हणजेच ५५.९८% नळ सुविधा उपलब्ध झालेली आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्यात सर्वात कमी ५५,१३,८१९ म्हणजेच ३७.७४% नळ व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

या योजनेकरिता एकूण १४,६३४.३३ रुपये निधी मंजूर झालेला आहे. त्यापैकी १,९३५.६३ एवढा निधी उपलब्ध असून ८४८.४४ रुपये निधी खर्च झालेला आहे.

शंभर टक्के पूर्ण झालेले राज्य  

गोवा, तेलंगण, अंदमान-निकोबार, पाँडेचरी, दादरा-नगर हवेली, हरियाणा या राज्यांतील प्रत्येक घरात नळाद्वारे पाण्याचा पुरवठा १०० टक्के झालेला असून त्यात पाठोपाठ  पंजाब, गुजरात, हिमाचल प्रदेश, बिहार, व सिक्किम या राज्यांनी ८० ते ९९ टक्के घरांमध्ये पाणी उपलब्ध करून देण्यात यश मिळवले आहे. त्या खालोखाल महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, उत्तराखंड, मिजोराम, जम्मू-काश्मीर, आंध्रप्रदेश व त्रिपुरा या राज्यांनी ५० ते ७० टक्क्यांपर्यंत यश मिळवले आहे.

कर्नाटक, उडीसा, तामिळनाडू, नागालैंड, केरला, मध्यप्रदेश, मेघालय, असम, लद्दाख हे राज्य २५ ते ५० टक्के पर्यंत पोहचलेले आहेत.

सर्वात खालील राज्य 

राजस्थान, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ, झारखंड आणि उत्तरप्रदेश हे राज्य सर्वात खाली असून यांची टक्केवारी ही १० ते २५ टक्केच्या पर्यंतच आहे.

योजनेचे उद्दिष्ट

प्रत्येक ग्रामीण भागातील व्यक्तीस, स्वयंपाकासाठी आणि घरगुती वापरासाठी शुद्ध, पुरेसा आणि शाश्वत पाणीपुरवठा सर्वकाळ आणि सर्व परिस्थितीत सोयीच्या ठिकाणी उपलब्ध करून देणे हा योजनेचा गाभा आहे. त्यानुसार २०२४ पर्यंत देशातील ग्रामीण भागातील घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रति दिन, गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करणे. यानुसार आदिवासी पाडे, शाळा, अंगणवाडी, वसतिगृहे आदी ठिकाणीही नळ जोडणी देणे अपेक्षित आहे.

माहिती स्त्रोत : JJM Dashboard






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागा अंतर्गत सर्वात जास्त गुन्हे नाशिक विभागात

अमरावतीकारांना गतवर्षी पेक्षा यंदा उन्हाचे चटके अधिक